मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. याचे पडसाद राज्यातील राजकारणातही उमटले होते. पण आता दोन वर्षानंतर कूपर रुग्णालयातील कर्मचारी रुपकुमार शाह यांनी माध्यमांसमोर खळबळजनक दावा केला आहे.
रुपकुमार शाह यांच्या दाव्यानुसार, ”सुशांतसिंहला मारहाण झाली होती. त्याचा हात तुटला होता. त्याला जेव्हा शवविच्छेदनासाठी नेण्यात आले तेव्हा या संदर्भात मी डॉक्टरांना सांगितले होते. तेव्हा त्यांनी माझे काम मी करतो, बाकी मला माहीत नाही, असे सांगून मला गप्प केले. सुशांतसिंहच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्याला मारहाण झाली होती. हे मी १०० टक्के सांगू शकतो”.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत व दिशा सालियान यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी गृहमंत्र्यांकडे केली. आता हा मुद्दा पुन्हा राजकीय वळण घेत आहे.