नवी दिल्ली | कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर (Hijab Case) बॅन करण्यात आला होता. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्याची परवानगी देणारी याचिका मुस्लिम विद्यार्थ्यीनींकडून कर्नाटक उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेले होते. या प्रकरणावर १० दिवसांच्या सुनावणीनंतर २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नव्हता परंतु त्यावर आज निर्णय होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि न्यायाधीश सुधांशु धुलिया यांच्या खंडपीठाने या प्रकरणावरील निर्णय दिला नव्हता. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने याचिकाकर्त्यांना एक तासाच्या आत आपला युक्तीवाद पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. आमचा संयम जात आहे, असे कोर्टाने सांगितले होते. तर, मुस्लिम तरुणींना हिजाब वापरण्यास मनाई केल्यास त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्या वर्गात येणं बंद करू शकतात, असा तर्क याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिला होता.
हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे सोपवावं असा काही वकिलांचा आग्रह होता. या प्रकरणावर राज्यात हंगामा झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकारने हिजाबवर बॅन आणण्याचा निर्णय घेतला. त्याचा धर्माशी काही संबंध नव्हता. हा आदेश निपक्षपाती होता, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वकिलाने केला होता. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.