आशापुरा माता मंदिरात दिवाळी पाडवा पहाट चे आयोजन
पुणे | दिव्यांच्या रोषणाईने झालेला दीपोत्सव,आशापुरा माताची आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि सुरेल मराठी-हिंदी गाण्यांच्या मैफिलीने आशापुरा माता मंदिरात दिवाळी पाडवा पहाट रंगली.
माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे च्या वतीने दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहाटे पाच वाजण्यापूर्वी सहपरिवार उपस्थित राहिलेल्या कुटुंबांमधून पाडव्याच्या शुभ दिवशी मातेच्या मंदिराचे दरवाजे उघडण्याचा लाभ मिळाला. या कुटुंबांची निवड लकी ड्रॉ मधून करण्यात आली.
साडेतीन हजार दिव्यांची रोषणाई यावेळी करण्यात आली होती आणि त्या रोषणाई मध्ये संपूर्ण मंदिराचा परिसर प्रकाशात उजळून निघाला.
याप्रसंगी माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेचे विमलाबाई भंडारी, विजय भंडारी, चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, विजयकांत कोठारी, राजेशकुमार सांकला, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया, राजेंद्र गोयल, राजीव अग्रवाल, दिलीप मुनोत, मनोज छाजेड, आनंद अगरवाल, योगेश पोद्दार, महेंद्र गदिया, संतोष माळवदे, विकास अगरवाल, अशोक भंडारी, दिनेश सरनोत, अशोक भलगट, प्रवीण राका, अनिल गेलडा, लकीशा मर्लेचा, सिद्धार्थ गुंदेचा, हेमंत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळी पाडवाच्या मंगलमय पहाटेच्या वेळी करण्यात आलेल्या रंगबिरंगी फटाक्यांच्या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला होता.
यावेळी सुप्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर आणि सहकलाकारांनी गणेश आराधनेने गाण्यांच्या मैफिलीस सुरुवात केली. भूपाळी, भक्तीगीते, भावगीते सादर करत कलाकारांनी पाडव्याची पहाट सुरेल केली. सूर निरागस हो, घनश्याम सुंदरा, विठ्ठला तू वेडा कुंभार,कानडा राजा पंढरीचा, अधीर मन झाले, खंडेरायाच्या लग्नाला,जीना इसीका नाम है यासह अनेक मराठी व हिंदी गाणी त्यांनी सादर करत रसिकांची दाद मिळवली.