नंदूरबार | आमचं सरकार आल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी केलं. आमच्या सरकारने 6 हजार कोटींचा निधी जाहीर केला. तसेच विकास मंदावला होता, पण आम्ही चालना दिली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तीन महिन्यांपूर्वी जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आलं, असेही त्यांनी सांगितले.
नंदुरबार नगरपरिषद नूतन प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजारपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी तीन महिन्यात सरकार आल्यानंतर करण्यात आली.
याशिवाय, एकाच दिवशी 6 लाख 90 हजार लोकांच्या खात्यात एकाच क्लिकवर अडीच हजार कोटी रुपये देण्यात आले. पण ज्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांनाही द्यायचे सुरु आहे. राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. सततच्या पावसाने काही शेतकरी नुकसान भरपाईच्या निकषात बसत नव्हते. पण पंचनामा करून त्यांनाही पैसे देण्याच्या सूचना आम्ही केल्या. काही लोकं बांधावर जातात त्यांनाही मी कामाला लावले आहे. शेवटी काम तर करायला पाहिजे सरकारमध्ये असलेल्यांनी आणि बाकी लोकांनीही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
दरम्यान, लोकांना मदत झाली पाहिजे, अशी सरकारची भावना आहे. हे सरकार लोकांचे आहे. लोकांना मदत करणारे सरकार आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू आपण मानला आहे. त्यामुळे त्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.