मुंबई | “तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप, भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार निशाणा साधला. तसेच ज्याला भविष्य माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धारेवर धरले.
उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे त्यांनी शेतकरी संवाद मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, बुलढाण्यात जिथं जिजाऊंच जन्मस्थान आहे तिथे माझी सभा होईल, हे मी सांगितलं होतं. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच गाडायची आहे. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील सभेत पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवर खोके घेतल्याचा आरोप करत निशाणा साधला होता. त्यावर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी कडक शब्दांत समाचार घेतला.