पुणे | पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आमदार निलेश लंके यांच्या कोविड काळातील कामाविषयीचा आढावा असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असं सांगितलं नसलं तरी मी साहेबांच्या विचारधारेसोबत आहे असं म्हटलं आहे.
काल भाजपामधून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अधिक वाढू लागल्या आणि आज अखेर त्याला पूर्णविराम देत त्यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पुण्यातील पक्ष कार्यालयात शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार निलेश लंके, माजी नगरसेवक वसंत मोरे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मी साहेबांच्या विचारधारेसोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लंके यांच्या भूमिकेमुळे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावं लागणार आहे अशी शक्यता आहे.