नाशिक | नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकचा हा भाग कांदा व द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध असलेला भाग म्हणून ओळखला जातो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या काळात कांदा निर्यात 35 टक्क्यांनी वाढली आहे. ऑपरेशन ग्रीनद्वारे सरकार कांदा उत्पादकांना सबसीडी देत आहे असं वक्तव्य केलं. केंद्र सरकारने आतापर्यंत वर्षाला 7 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली आहे. त्यासोबतच शेतकरी वर्गाचा कांदा शिल्लक राहू नये व योग्य भाव मिळावा म्हणून येत्या काळातही मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहणार असल्याचं पीएम मोदींनी सांगितलं आहे.
या सभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सभेसाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी ‘कांद्यावर बोला’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं आहे. याबरोबरच या सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही हेरलं होत. मविआच्या नेत्यांबाबत बोलताना नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार आहे जेव्हा विलिनीकरण होईल तेव्हा मला सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल.
तसेच बाळासाहेब म्हणायचे की, मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली की, मी माझे दुकान बंद करेल मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही. अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते मात्र याचे सर्वात मोठे दुःख नकली शिवसेनेला होत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कांद्याच्या प्रश्नावर बोलण टाळल्याचं दिसून आलं होत पण आज त्यांनी मौन सोडत याबाबत भाष्य केलं आहे.