मुंबई | राज्यात नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यापाठोपाठ आता केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. यामधील कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मनसेचे नेते अभिजित पानसेंना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली पण अभिजीत पानसे नेमके मनसेचे उमेदवार आहेत की महायुतीचे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय…यामागचं नेमकं कारण काय? हे आपण सदर व्हिडिओतून जाणून घ्या.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ४ जागा रिक्त होत असून त्या जागांवर मतदान पार पडणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातील विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील कपिल पाटील हे विधान परिषद सदस्य येत्या 7 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. 31 मे रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली जाईल. 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. 10 जूनला त्या अर्जांची छाननी करण्यात येईल. 12 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
आता कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली खरी मात्र, आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित होत आहे…कारण कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच जागेवर मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे…
निरंजन डावखरे हे भाजपच्या युवा नेत्यांपैकी एक आहेत. घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या निरंजन यांचा अल्पावधीतच राष्ट्रवादी ते भाजप असा प्रवास झाला. सध्या ते भाजपचे आमदार म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. दुसरीकडे मनसेचे नेते अभिजित पानसे यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते प्रसिद्ध सिनेलेखक, दिग्दर्शक आणि मनसेचे नेते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी बाळासाहेबांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी संजय राऊतांनी अभिजीत पानसेंची निवड केली. अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमा महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रचंड गाजला.
शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेची धुरा पानसे यांच्या खांद्यावर होती मात्र, नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी बाळासाहेबांकडून युवासेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं मग नाराज पानसे यांनी शिवसेनेची साथ सोडत मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला. अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. अभिजीत पानसे यांनी २०१४ साली ठाण्यातून लोकसभा निवडणूकही लढवली होती. तेव्हा ते तिसऱ्या स्थानी राहिले होते.
आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेवेळी युतीला बिनशर्त पाठींबा दिला होता पण कोकण पदवीधर मतदार संघात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच मनसेने इथून आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यात भाजप यावर काय निर्णय घेणार याशिवाय भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या मनसेनं उमेदवार उतरवल्यामुळे डावखरेंना तिकीट मिळणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.