मुंबई | राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला आहे. ‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.
मात्र पवारांच्या या घोषणेनंतर सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. साहेब निर्णय मागे घ्या अशी मागणी सर्व कार्यकर्त्यांनी केली होती. शरद पवारांनी त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात निर्णय घेतला जाईल असं म्हटलं होत. त्यामुळे आता या समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्यानं प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान ‘सिल्वर ओक’वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कोण आहेत समितीमधील नेतेमंडळी?
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.
दरम्यान या घटनेला दोन दिवस उलटून गेले आहेत त्यामुळे आज शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर समिती निर्णय देणार आहे. समिती काय निर्णय देणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. त्यांनतर शरद पवार देखील आपला निर्णय मागे घेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.