बारसू | आज रत्नागिरीतील बारसू गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. इथे रिफायनरी विरोधकांची भेट देखील ते घेणार आहेत. तर दोन ठिकाणी ते विरोधकांना भेटणार आहेत. सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी बारसू आणि परिसरातील विरोधकांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेही बारसूमध्ये जात आहेत. बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीचं माती परीक्षण सुरु आहे. या मुद्द्यावर आजवर जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्या आरोपांना उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यात उत्तर देणार का, हा प्रश्न आहे.
रोजगार जरी असला तरी ती जागा कोणाची आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. पक्षप्रमुख बारसूला जात आहेत आणि लोकांना समजून घेणार आहेत. उद्धव ठाकरे समर्थक आणि विरोधक या दोघांनाही भेटणार आहे. तसंच आदित्य ठाकरे देखील पुण्यात वेताळ टेकडी आणि चिपको आंदोलकांच्या भेटीसाठी जात आहेत. दोन्ही विषय पर्यावरणाविषयी आहे त्यामुळे महत्त्वाचे आहेत, असं ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
राजापूर तालुक्यातून या प्रकल्पाला समर्थन आहे ते ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी येथील विविध संघटना, ग्रामपंचायतींचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक त्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, राजापूरमध्ये आज रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा निघणार आहे. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार हजर असणार आहेत. यावेळी रिफायनरीसाठी असलेले समर्थन दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.