औरंगाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची हवा देशातून संपत चालली आहे. 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे, असे विधान शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर माजी खासदार खैरे यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ”नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या सभेत पाच मुख्यमंत्री आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. त्यामुळे 2024 ला नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे”.
मुंबई दौरा ठरवून काढलेला दौरा
भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा ठरवून काढलेला दौरा आहे. कारण आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असल्याने मतदार भुलवण्यासाठीच नरेंद्र मोदी मुंबईत आले. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कोणतेही यश येणार नाही, असेही खैरे यांनी सांगितले.