मुंबई | आजच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोनही गटाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंचा आवाज शिवतीर्थावरून घुमणार तर आझाद मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज दणाणणार आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते देखील विभागले आहेत त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या आवडीच्या नेत्याच्या भाषणासाठी मुंबईकडे रवाना झाला आहे. आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.
तर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी एमएमआरडीए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात ही खुर्ची ठेवण्यात आली होती. यावर्षीही बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार. शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते.
दरम्यान पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा असून त्यांच्या धनुष्यातून कोणता बाण सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आज काय भूमिका घेणार हे देखील पाहण महत्वाचं ठरणार आहे.