मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या माथी घटनाबाह्य सरकार मारून मोठा अपराध केला आहे असा घणाघात शिवसेना उबाठा गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे सरकार आल्यापासून गावागावात गुन्हेगारी वाढली आहे असेही ते म्हणाले. गोळीबार प्रकरणावरून राउतांनी ही टीका केली आहे.
शिंदे गटातील आमदार, खासदार हे रोज गुंड टोळ्याबरोबर चाय पे चर्चा करत आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठीच फडणवीस यांना गृहमंत्रीपद दिले आहे का? असे नसेल तर गुंडांना पाठिशी घालणाऱ्यांना तुरुंगात टाका अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मोदी-शाह यांनी हे सरकार आमच्यावर लादल्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी असेही ते यावेळी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या टोळीमध्ये गुंड आणि पोलिसांचा समावेश केला आहे. कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात शिंदे पिता-पुत्रांचे नाव घेण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी ताबडतोब चौकशी करायला हवी. गणपत गायकवाड यांनी स्वतः मुख्यमंत्री शिंदेंचं नाव घेऊनही मुख्यंमत्र्यांची साधी चौकशी होत नाही. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आले, दिल्लीत केजरीवाल यांची चौकशी सुरु आहे. पण महाराष्ट्रात शिंदेंना साधा जाबही विचारला जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसने गोळ्या झाडून त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या केली. सध्या सोशल मिडीयावर या दोघांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.