जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन झाल्यामुळे त्याठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. तिथलं वातावरण देखील तणावाचं असल्यामुळे पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे आज सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी आणि जखमी गावकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेतेमंडळी जालना दौऱ्यावर येत आहेत.
त्याठिकाणी एकाच वेळी शरद पवार आणि उदयनराजे भोसले उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी काल नेमकं काय घडलं याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करण्याची उदयनराजे यांनी मागणी केली असून, बळाचा वापर करण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
कालची घटना दुर्देवी आहे सरकारने दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही. पोलीस या ठिकाणी आणले गेले. लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली आणि दुसरीकडे लाठी हल्ला केलाय तर यात संबध नसलेल्या लोकांवर लाठीचार्ज केलाय. मी हॉस्पिटलला गेलो तेव्हा काही लोकांना छर्रे लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनात बळाचा वापर करायला नको होता. शब्द न पाळल्यानं आंदोलन सुरु झालं. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही. हवेत गोळीबार करण्यात आले. इथलं उपोषण स्वतःच्या फायद्यासाठी नव्हतच. मोठ्या संख्येने पोलीस आणले गेले होते. तर याठिकाणी बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
तर याचवेळी व्यासपीठावर असलेले उदयनराजे बोलताना म्हणाले की, ज्यांनी हा प्रकार केला त्यांना निलंबित करण्यात यावे. जखमींचा उपचार खर्च शासनाने करावा. आरक्षणच्या मागणीसाठी न्यायिक प्रकिया तात्काळ सुरु करावी. मी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांची आंदोलनकर्ते आणि इतरांची भेट घालून देऊ तसेच आतापर्यंत 57 महामोर्चा काढले त्यावेळी कुठला अनुचित प्रकार झाला नाही. मोठा समाज आहे त्याकडे दुर्लक्ष केले. शरद पवार, जयंत पाटील सगळ्यांनी एकत्र येवून तोडगा काढावा. गायकवाड कमिशन मधील त्रुटी दूर कराव्यात. क्यूरुटीन पिटीशन दाखल केले आहे, त्यात मदत होईल असं करावं. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर या सारखं दुर्दैव नाही. ज्यांनी हे लाठीचार्जचे आदेश दिले, त्यांचा मी तीव्र निषेध करतो. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी करतो. जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्यात यावेत. ज्या मागण्या मनोज यांनी दिल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे उदयनराजे म्हणाले.